महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात; जगातील सर्वात रुंद बोगद्यांची जागतिक स्तरावर नोंद!

: पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई – पुणेदरम्यानच्या प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून हा प्रकल्प जागतिक स्तरावरही आता ओळखला जाणार आहे. कारण आता मिसिंग लिंक प्रकल्पाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मिसिंग लिंकमधील दोन बोगद्यांची नोंद गिनीज बुकमध्ये जगातील सर्वात रुंद, २३.५ मीटर रुंदीचे बोगदे म्हणून झाली. तर हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाची नोंद लिम्का बुकमध्येही करण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली आहेत.

मुंबई – पुणे प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई – पुणे अंतर अडीच ते तीन तासांत पार करणे सोपे झाले. मात्र आता या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून भविष्यात ती आणखी वाढणार आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्ग अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता महामार्गाची क्षमता वाढवून प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी एमएसआरडीसीने महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम हाती घेतले होते.

एमएसआरडीसीने महामार्गावरील खोपोली – कुसगावदरम्यान १३.३ किमी लांबीची आणि सुमारे ६ हजार ६९५ कोटी रुपये खर्चाची नवीन मार्गिका बांधण्याच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात केली. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. पण आता मात्र प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून आज अवघ्या काही तासांत ही मार्गिका अर्थात मिसिंग लिंक सेवेत दाखल होणार आहे. मिसिंग लिंकवरून प्रवास सुरू झाल्याने घाटाचा प्रवास टळणार असून ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वास बराच विलंब झाला असला तरी हे काम अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सातत्याने एमएसआरडीसीकडून सांगितले जात होते. दऱ्या-खोऱ्यात, वादळ-वाऱ्यात, पावसात येथे काम करणे अत्यंत अवघड होते.

या प्रकल्पाची ओळख जागतिक स्तरावर झाली आहे. एमएसआरडीसीकडून या प्रकल्पाची नोंद देश स्तरावर व्हावी यासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या आणि जागतिक स्तरावर व्हावी यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या समितीकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी बोगद्याची पाहणी केली होती. पाहणीनंतर अखेर या बोगद्याची नोंद जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून झाली आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरच ही नोंद झाली असून महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. दरम्यान, अभियांत्रिकी चमत्कार (इंजिनीअरिंग मार्वल) म्हणून हा प्रकल्प देश स्तरावर ओळखला जावा यासाठी लिम्का बुकमध्ये प्रकल्पाची नोंद करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button