
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला गृहमंत्री योगेश कदम यांचा प्रतिसाद
“पुढील वर्षभर सोने खरेदी करणार नाही”
खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणार नसल्याची भूमिका जाहीर केली. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जामगे येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना कदम म्हणाले की,“आज अनेक आशियाई देशांमध्ये इंधनाची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी १५ ते २० दिवस इंधन उपलब्ध होत नाही. त्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्हीही पुढील वर्षभर सोने खरेदी करणार नसल्याचे ठरवले आहे.”
यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावरही भर दिला. “आम्ही स्वतः घरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहोत. ग्रामीण भागातही चार्जिंग पॉईंट्स उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून नियोजन करून खासगी ठिकाणीही चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे,” असे कदम यांनी सांगितले.
विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “आज जे विरोधात आहेत त्यांनीच यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये नागरिकांना काही काळ सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी जागतिक परिस्थिती स्थिर होती. आज मात्र जागतिक घडामोडींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकार पूर्वतयारी म्हणून पावले उचलत आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतही त्यांनी माहिती दिली. मंडणगड व दापोली तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शासनासह शिवसेनेकडूनही बाधितांना मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई व ठाणे येथील पक्ष संघटनात्मक जबाबदारीबाबत बोलताना कदम म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही काम करत आहोत. मंत्रीपदाचा उपयोग शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी केला जाईल.




