चिपळूणमध्ये विद्यार्थ्यांची जवानांसाठी अनोखी राखी रॅली

१२०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंगा हातात घेत ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’च्या घोषणांनी दुमदुमले शहर

चिपळूण : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूण शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम उत्साहात राबविला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी युनायटेड इंग्लिश स्कूल ते चिपळूण पोस्ट ऑफिस अशी भव्य देशभक्तीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीत तब्बल १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

रॅलीपूर्वी शाळेच्या परिसरात राखी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभाग घेतला. लेझीम पथकाची उपस्थिती आणि ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी चिपळूण शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

युनायटेड इंग्लिश स्कूलपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून चिपळूण पोस्ट ऑफिस येथे पोहोचली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोस्टमन यांच्याकडे सुपूर्द केल्या. या राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पाठविण्यात येणार आहेत. जवानांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपुलकीचा संदेश मिळावा आणि त्यांच्या कार्याप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या उपक्रमाला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, निवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव शिंदे, युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, भूषण थत्ते, सैनिक पत्नी, नगरसेवक तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.

विशेष म्हणजे, कार्यक्रमादरम्यान श्रीतेज समेळ याने गाऱ्हाणे घालत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना केली. त्याच्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले.

परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून त्या जवानांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि जवानांप्रती आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जवानांच्या शौर्याला विद्यार्थ्यांची मानवंदना

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नसले तरी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठविल्या. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘देशरक्षण करणाऱ्या जवानांशी आपलेही नाते आहे’, असा भावनिक आणि देशभक्तीपर संदेश देण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button