मोबाईल-टॅब्लेटच्या अतिवापरामुळे मुलांना होऊ शकतो मायोपिया; स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे?

Screen Time Eye Effect Myopia : एका १२ वर्षीय मुलाला वर्गात शिक्षक फळ्यावर लिहित असताना फळ्यावरील अक्षरं स्पष्ट दिसत नव्हती. तो घरी आल्यानंतरही डोळे चोळत असे आणि डोकेदुखी होत असल्याची तक्रार करत असे, त्यामुळे त्याचे पालक त्याला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेले.

पालकांनी सांगितले की त्यांचा मुलगा ऑनलाइन क्लास, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्यासाठी दररोज अनेक तास टॅबलेट वापरत होता. हे सगळं स्क्रीनटाइममुळे होत आहे असे त्यांना वाटले. मात्र, नेत्रतपासणीनंतर त्याला मायोपिया म्हणजेच दूरचं अस्पष्ट दिसण्याची समस्या असल्याचं समोर आलं. डोळ्यांवरील ताण ही केवळ एक सामान्य बाब नसून, त्यामागे डोळ्यांची गंभीर समस्या दडलेली असू शकते, हेच या मुलाच्या उदाहरणातून स्पष्ट होते.

सेंटर फॉर साइट ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. महिपाल सिंह सचदेव सांगतात की, सर्वच पालकांनी त्यांच्या मुलाच्या स्क्रीन टाइमबाबत सतर्क राहिले पाहिजे. सतत मोबाईल किंवा स्क्रीनकडे अगदी जवळून पाहणे, तसेच मैदानी खेळ न खेळणे आणि बाहेरील नैसर्गिक प्रकाशाशी संपर्क न येणे, अशा परिस्थितीच्या सवयींमुळे डोळ्यांमधील बुबुळ (Eyeball) सामान्य आकारापेक्षा अधिक लांबट होऊ लागतो. परिणामी, डोळ्यात प्रवेश करणारा प्रकाश थेट रेटीनावर (Retina) पडण्याऐवजी त्याच्या आधीच केंद्रित होतो आणि त्यामुळे लांबच्या गोष्टी धूसर दिसू लागतात.

सकाळी उठल्या उठल्या हातातील फोन अनलॉक करण्यापासून ते ऑफिसमधील लॅपटॉपच्या स्क्रीनपर्यंत आणि रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करण्यापर्यंत… आपला दिवस नेमका कसा सुरू होतो आणि संपतो, यावर आपण कधी बारकाईने विचार केला आहे का? डिजिटल उपकरणांनी आपले काम आणि संपर्क साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली असली, तरी या सततच्या स्क्रीन टाईमची किंमत आपल्या डोळ्यांना मोजावी लागते.

सतत स्क्रीन पाहिल्याने ‘डिजिटल आय स्ट्रेन’ (Digital Eye Strain) म्हणजेच डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर नजर खिळवून ठेवल्यानंतर डोळ्यांत कोरडेपणा येणे, डोळे लाल होणे, जळजळ होणे, दृष्टी धूसर होणे, डोके दुखणे आणि डोळ्यांवर प्रचंड थकवा येणे ही लक्षणं जाणवतात.

मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीमध्ये हरवून गेलं म्हणजे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होतेच असं नाही. मात्र, बराच वेळ जवळून स्क्रीन पाहत राहिल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो, डोळ्यांत जळजळ, थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे तंत्रज्ञान पूर्णपणे टाळण्याची गरज नाही; दिवसभरात डोळ्यांना पुरेशी विश्रांती दिली तरी डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.

२०-२०-२० नियमाने डोळ्यांना मिळू शकतो आराम

स्क्रीन वापरताना डोळ्यांना नियमित विश्रांती देण्यासाठी २०-२०-२० नियम उपयोगी ठरू शकतो.

दर २० मिनिटांनी स्क्रीनपासून नजर हटवावी, त्यानंतर सुमारे २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे किमान २० सेकंद पाहावं. अशा छोट्या ब्रेकमुळे डोळ्यांना काहीशी विश्रांती मिळू शकते आणि डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणं कमी होण्यास मदत होऊ शकते.

स्क्रीन पाहताना जाणीवपूर्वक पापणी लवत राहावी, स्क्रीन डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवावी, त्यावर प्रकाशाची झळ पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवावी. डोळ्यांमध्ये कोरडेपणा कायम राहिल्यास स्वतःहून ड्रॉप्स वापरण्याऐवजी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. महिपाल सांगतात.

डोळ्यांसाठी फक्त ब्लू लाईट हानिकारक नसतो

स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशाबाबतही अनेक गैरसमज आहेत. रात्रीच्या वेळी अतिप्रमाणात स्क्रीनकडे पाहिल्यास शरीराच्या झोप-जागेपणाच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. मात्र, सध्याच्या उपलब्ध पुराव्यांनुसार सामान्य डिजिटल स्क्रीनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होते किंवा वयाशी संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका वाढतो, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

सतत किंवा चुकीच्या पद्धतीने स्क्रीन पाहिल्यास डोळ्यांचा त्रास होतो. येथे केवळ निळ्या प्रकाशाला दोष देऊन चालत नाही. स्क्रीन वापरण्याची पद्धत आणि डोळ्यांना दिली जाणारी विश्रांती अधिक महत्त्वाची ठरते.

मुलांच्या डोळ्यांकडे विशेष लक्ष का द्यावे?

मुलांच्या बाबतीत स्क्रीन टाइमचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो. वाढता स्क्रीनटाइम आणि घराबाहेरचा नैसर्गिक प्रकाश मुलांना मिळत नसेल तर त्यांच्यात मायोपिया म्हणजेच दूरचं अस्पष्ट दिसण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पालक जर टीव्ही पाहत असतील आणि मुलेदेखील त्यांच्यासोबत बसले असतील तर मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो, त्यामुळे मुलांच्या स्क्रीन टाइमची निश्चित वेळ ठरवणं गरजेचं आहे; तसेच काही मुलांना सतत टॅब किंवा मोबाईलवर पाहून काही शाळेचे उपक्रम करावे लागतात, अशा वेळी त्यांच्या पालकांनी त्यांना ब्रेक घेण्यास प्रोत्साहित करणं आणि मुलांना पुरेसा वेळ घराबाहेर नैसर्गिक प्रकाशात खेळण्यास सांगावं, यामुळे चांगला फरक पडू शकतो, असेही डॉ. महिपाल सांगतात.

पालकांनी मुलांना मोबाईल, टॅबलेट किंवा गेमिंग डिव्हाइससमोर सलग अनेक तास बसू देऊ नये. बाहेर खेळणं ही केवळ अधूनमधून करण्याची गोष्ट न ठेवता मुलांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.

डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे कधी जावं?

बराच वेळ स्क्रीनसमोर बसून राहिल्यानंतर अधूनमधून डोळ्यांना थकवा जाणवू शकतो. मात्र, दृष्टी धूसर होणे, वारंवार डोकेदुखी किंवा डोळ्यांत दुखणे, डोळे लाल होणे, दुहेरी दिसणे, दूरच्या वस्तू स्पष्ट न दिसणे किंवा डोळ्यांमध्ये सतत कोरडेपणा जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नये. हे केवळ स्क्रीनटाइममुळेच होतंय असा निष्कर्ष काढू नये.

सर्वसमावेशक नेत्रतपासणी केल्यास यामागे डोळ्यांचा नंबर किंवा डोळ्यांशी संबंधित इतर समस्या आहेत का हे समजू शकतं. मुलांची नियमित नेत्रतपासणी विशेष महत्त्वाची आहे. दृष्टीमध्ये समस्या आहे हे सुरुवातीलाच लक्षात आले तर त्याचा दैनंदिन कामांवर होणारा परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते.

स्क्रीनचा वापर आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे; तो पूर्णपणे टाळणं शक्य होत नाही. मात्र, नियमित ब्रेक घेणे, वारंवार पापण्या लवणे, घराबाहेर वेळ घालवणे आणि वेळोवेळी नेत्रतपासणी करून घेणे अशा छोट्या सवयी डोळ्यांवरील ताण कमी ठेवण्यासाठी आणि दृष्टी निरोगी राखण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button