
नीट’ परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये
देशभरात सातत्याने गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेआगामी २१ जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित व योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सरकारने थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाची मदत घेतली जाणार आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.
नीटच्या फेरपरीक्षेच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




