
दैव बलवत्तर म्हणून बस संरक्षण कठड्यावर अडकल्याने बस दरीत कोसळण्यापासून वाचली
माणगाव रायगड मार्गावर महाड तालुक्यातील पुनाडेवाडी गावाजवळ घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून बस संरक्षण कठड्यावर अडकल्याने बस दरीत कोसळण्यापासून वाचली आणि आतमध्ये असलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले .29 मे ला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पुणे येथून अक्षरा ट्रॅव्हल या खाजगी कंपनीची बस पुणे येथून पर्यटकांना घेऊन रायगड कडे रवाना झाली होती. माणगाव मार्गे रायगड कडे येत असताना पुनाडवाडी या ठिकाणी घाटामध्ये एका वळणावर चालकाचे बस वरील नियंत्रण चुकल्याने बस थेट संरक्षक कठड्यावर जाऊन आपटली. बसचा पुढील भाग संरक्षक कठड्यावर अडकून बसल्याने बस दरीत कोसळण्यापासून वाचली.
यावेळी बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते हे सर्व प्रवासी सुखरूपपणे बसच्या बाहेर पडले. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.




