
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, संगमेश्वर-कसबा येथील महाराजांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे शासकीय मानवंदना!
संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एक अभूतपूर्व आणि अभिमानास्पद घटना घडली आहे. ३६९ व्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, संगमेश्वर-कसबा येथील महाराजांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात आली. पोलीस दलातर्फे अशा प्रकारे मानवंदना देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
कसबा याठिकाणी पार पडलेल्या या सोहळ्यात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना सादर केली. संभाजी महाराजांच्या अजोड शौर्याला, पराक्रमाला आणि स्वराज्य रक्षणाच्या विचारांना ही आगळीवेगळी मानवंदना आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली हे माझे भाग्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आसलेल्या जिह्यातून, शहरातून मी येतो, याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले स्वाभिमान आहेत – पोलीस अधीक्षक नितीन बगाटे*



