
चिपळुणात आरक्षित जागांची परस्पर विक्री?
चिपळूण शहरातील काही जागांवर गेल्या कित्येक वर्षापासून खेळांची मैदाने, उद्याने आदीसाठी आरक्षणे आहेत. यातील काही जागा यापूर्वी विकसित झाल्या असल्या तरी बहुतांशी जागा विकसित करण्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. याला बरीच कारणे असून संबधित जागा मालकांना राजकीय आशीर्वाद हे मुख्य कारण आहे. त्यामुळे आता बर्याच मालकांनी जागांची परस्पर विक्री सुरू केली आहे. तर काहीजण आरक्षण उठवण्यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज करीत आहेत.
शहरातील मार्कंडी भागातील एका जागेची परस्पर विक्री झाल्याची तक्रार नगरसेवक शशिकांत मोदी यांनी जिल्हाधिकार्यांसह नगरपरिषदेकडे केली आहे. त्याची चौकशी सुरू असतानाच सध्या गोगळकोट येथील आरक्षित जागेचे आरक्षण उठवण्याचा प्रश्न जागत आहे. याही जागेत बराच घोळ असून ही जागा मालकाव्यतिरिक्त काही अन्य व्यक्ती विकण्याच्या तयारीत आहेत. या जागेसाठी अनेक ग्राहक तयार झाले असून त्यांच्याकडून टोकन म्हणून प्रत्येकी ६ लाख रुपये घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या जमिनीच्या विक्री प्रकरणामुळेच तिच्यावरील आरक्षण उठवण्याचा मुद्दा पार मंत्रालयापर्यंत गेला आहे. मात्र आरक्षण उठवण्यास नागरिकांचा कडाडून विरोध असून या जागेत आरक्षणाप्रमाणे मराठी शाळा व मैदान विकसित करण्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com




