कोकणातील काजू प्रकल्पांबाबत गैरसमज; सर्व सुविधा कोल्हापूरला गेल्याचा दावा चुकीचा —रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘काजू कोकणात पिकणार… नफा मात्र कोल्हापुरात जाणार?’ या पोस्टमुळे काजू प्रकल्पांबाबत गैरसमज निर्माण होत असल्याचे सांगत रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी संबंधित दाव्यांचे खंडन केले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काजू परिषदेकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील MIDC क्षेत्रांमध्ये जागेची मागणी करण्यात आली होती. काजू बाजार समिती, प्रक्रिया प्रकल्प, निर्यात केंद्र, सेंटर ऑफ एक्सलन्स, गोदाम आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याचा या प्रस्तावात समावेश होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी प्रत्येकी २५ एकर जागेची मागणी करण्यात आली होती.

मे २०२६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी MIDC परिसरातील जागा मंजुरी प्रक्रियेला गती मिळाली असली, तरी त्यामुळे सर्व काजू प्रकल्प कोल्हापूरला स्थलांतरित होत आहेत, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले. कोकणातील काजू क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील प्रस्तावित जागांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर कोकणातील काजू उत्पादनाचा फायदा कोल्हापूरला वळवला जात असल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी महाराष्ट्र काजू परिषदेने सुरुवातीपासूनच तिन्ही जिल्ह्यांमध्ये सुविधा उभारणीचा विचार मांडला होता, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात काजू उत्पादनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे महत्त्वाचे योगदान असून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात क्षमतेला चालना देण्यासाठी कोकणात आधुनिक सुविधा उभारणे आवश्यक असल्याची भूमिका स्थानिक प्रतिनिधी आणि महाराष्ट्र काजू परिषद सातत्याने मांडत असल्याचेही सुर्वे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button