कॉक्रोच जनता पार्टीने भाजपाला टाकले मागे, १ कोटीहून अधिक फॉलोअर्स; मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, वाचा ५ महत्त्वाच्या घडामोडी!

कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आज अचानक कॉक्रोच पार्टीचे एक्स अकाउंट बंद करण्यात आले. इन्स्टाग्रामवर कॉक्रोच पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपाला मागे टाकले.

मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. एनएसए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने वांगचुक यांना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली होती. ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. पश्चिम बंगालमधील फालटा विधानसभा मतदारसंघात आज मतदान झाले. या निवडणुकीत टीएमसीचा उमेदवारच नाही, देशातील ५ महत्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या.

नवीन ‘एक्स’ अकाउंट उघडून कॉक्रोच जनता पार्टीची भाजपावर टीका

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरूणांबाबत केलेल्या विधानानंतर कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ही राजकीय व्यंग चळवळ सुरू झाली. या चळवळीला देशात प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर आज (गुरूवारी, २१ मे) अचानक कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट बंद करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच कॉक्रोच जनता पार्टीने नवीन एक्स अकाउंट उघडले. आता हे नवीन अकाउंट देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या संख्येत भारतीय जनता पक्षाला मागे टाकले आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तरूणांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. नवीन एक्स अकाउंटवरून कॉक्रोच जनता पार्टीने दोन नवीन पोस्ट केल्या आहेत. “तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्यापासून सुटका करून घ्याल? Lol “, असे एका पोस्टमध्ये झुरळाच्या फोटोसह म्हटले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये भाजपाच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सबरोबर कॉक्रोच जनता पार्टीची तुलना करण्यात आली. “त्यांनी आपल्याला ब्लॉक केल्याचं हेच कारण आहे”, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. फोटोत एक झुरळ कमळाचे फूल खाताना दाखवण्यात आले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर भाजपाला टाकले मागे, १ कोटीहून अधिक फॉलोवर्स

कॉक्रोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला मागे टाकले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्रामवर पाच दिवसांत एक कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. सरन्यायाधीशांनी बेरोजगारांवर केलेल्या वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. कॉक्रोच जनता पार्टीने भारतीय जनता पक्षासह देशातील सर्वात बलाढ्य पक्षांना फॉलोअर्सच्या तुलनेत मागे टाकले आहे. ही राजकीय व्यंग चळवळ आहे. कॉक्रोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर आज १० दशलक्ष म्हणजे एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला. भाजपाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटचे ८.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. काँग्रेसचे १३.२ दशलक्ष, तर २०१२ मध्ये स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचे १.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. देशातील विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सनी तसेच युट्युबर्सनी कॉक्रोच जनता पार्टीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात ध्रुव राठी, प्रशांत भूषण, महुआ मोईत्रा, किर्ती आझाद यांचा समावेश आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक घेणार आहेत. या वर्षातील ही पहिलीच मंत्रिपरिषद बैठक असून काही मंत्रालयांच्या कामकाजांचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. ही बैठक केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून विविध मुद्द्यांची चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जाते. भाजपमधील संघटनात्मक तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याने संबंधित बदलांबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश व गुजरात, पंजाब या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यादृष्टीने बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय दोन वर्षे सातत्याने वादात सापडले असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हेही वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. १५ जूननंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केंद्र सरकारशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात सोनम वांगचुक

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उद्या (२२ मे) केंद्र सरकारबरोबर होणाऱ्या ‘लडाख टॉक्स’मध्ये सहभागी होणार आहेत. ‘अपेक्स बॉडी लेह’च्या शिष्टमंडळात वांगचुक यांना सामील करण्यात आले आहे. हे शिष्टमंडळ लडाख संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा व सहाव्या सूचीमध्ये असलेले संरक्षण द्यावे, अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. एनएसए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने वांगचुक यांना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली होती. मार्च मध्ये त्यांची सुटका झाल्यानंतर ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात तीन प्रतिनिधी असतील, असे ‘अपेक्स बॉडी लेह’ने (ABL) लडाखचे मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांच्यामार्फत केंद्र सरकारला कळवले आहे. या प्रतिनिधींमध्ये सोनम वांगचुक यांचा समावेश आहे. चर्चेदरम्यान कायदेशीर सल्लागार म्हणून विक्रम हेगडे हे देखील शिष्टमंडळाबरोबर दिल्लीला जाणार आहेत.

पश्चिम बंगालमधील फालटा विधानसभा मतदारसंघात मतदान, टीएमसीचा उमेदवारच नाही

पश्चिम बंगाल मधील फालटा विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. विधानसभा निवडणुकांवेळी फालटा मतदारसंघात गैरप्रकार झाल्याने निवडणूक पुन्हा घेतली जाईल, अशी घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार आज मतदान पार पडले. या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी शेवटच्या क्षणाला निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. काँग्रेस, भाजपा आणि माकप या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत होत आहे. माघार घेतल्यानंतर टीएमसीचे नेते जहांगीर खान म्हणाले, फालटामध्ये स्थिरता, शांतता आणि विकास हवा आहे. लोकांची इच्छा पाहून निवडणुकीतून माघार घेतली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी फालटासाठी मोठे पॅकेज घोषित केले आहे. फालटाचा विकास होणार आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतली आहे, असे जहांगीर खान म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button