आधी जनगणना अन् शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या! SCERT चा शिक्षकांना कडक आदेश; शिक्षक संघटना आक्रमक !


वरिष्ठ व निवड श्रेणी वेतनश्रेणीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणापूर्वी जनगणना, ‘बीएलओ’ आणि इतर राष्ट्रीय कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘आधी जनगणना आणि शासकीय कामे पूर्ण करा, मगच प्रशिक्षणाला या’, अशा स्वरूपाच्या सूचनाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) देण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण २ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत विभागस्तरीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. पोर्टलवर नोंदणी केलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले असले, तरी त्याआधी प्रलंबित राष्ट्रीय कामे पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

सध्या अनेक शिक्षकांकडे जनगणना, ‘बीएलओ’ तसेच इतर शासकीय जबाबदाऱ्या आहेत. ही सर्व कामे २ जूनपूर्वी पूर्ण करूनच प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, अशा सूचना ‘एससीईआरटी’ ने केल्या आहेत. परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

अशैक्षणिक कामांचा ताण

प्रशिक्षणासाठी अवघे काही दिवस उरले असताना शाळेतील शैक्षणिक जबाबदाऱ्या, जनगणना आणि ‘बीएलओ’ची कामे एकाच वेळी पूर्ण करण्याचा ताण शिक्षकांवर येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे. पुढील शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनाही कोणतीही सवलत देण्यात आलेली नसल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे.

शिक्षकांवर आलेला तिहेरी ताण

१. अशैक्षणिक कामांचा बोजा: शिक्षकांना एकाच वेळी शाळा उघडण्याची पूर्वतयारी, वर्गांचे नियोजन आणि त्यातच जनगणनेची क्लिष्ट माहिती गोळा करावी लागत आहे.

२. सुट्ट्यांचे नियोजन कोलमडले: उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या असताना ऐनवेळी लागलेल्या या कामांमुळे शिक्षकांचे वैयक्तिक नियोजन विस्कळीत झाले आहे.

३. सेवानिवृत्त शिक्षकांनाही सवलत नाही: जे शिक्षक पुढील शैक्षणिक वर्षात (२०२६-२७) थेट सेवानिवृत्त (Retiring) होणार आहेत, त्यांनाही या अशैक्षणिक कामांमधून किंवा नियमांमधून कोणतीही प्रशासकीय सवलत देण्यात आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button