मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसून खेड येथील नईम बशीर चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू


महामार्गापासून शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांची समस्या वाढत असून प्रशासन त्याला आळा घालण्यास असमर्थ ठरत आहे
पत्नीला भेटण्यासाठी चिपळूणच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना लोटे येथे महामार्गावर फिरणाऱ्या मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसून खेड येथील नईम बशीर चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे येथील जुन्या महामार्ग पोलीस चौकीजवळ हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून धडक बसलेले जनावरही जागीच मृत झाले. हेल्मेट परिधान केलेले असतानाही नईम चौगुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील नईम चौगुले यांना तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने खेडसह परिसरात शोककळा पसरली आहे.
नईम बशीर चौगुले हे खेड भाजपाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. ॲड. वैभव खेडेकर यांचे विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांची ओळख होती. पक्षाच्या विविध उपक्रमांसह सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत असत. कोणत्याही सामाजिक कामासाठी पुढाकार घेण्याची त्यांची वृत्ती आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button