
‘शत प्रतिशत भाजप’साठी कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांचे आवाहन
केंद्र-राज्याच्या विकासकामांचा आणि योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा; कोकणातील तरुणांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न करण्याचा ठराव
रत्नागिरी : भाजपची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत करण्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांची आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करावे. गावागावात देशभक्तीची भावना रुजवून पक्षवाढीसाठी तन-मन-धन अर्पण करून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा आणि आढावा बैठक रत्नागिरी येथे पार पडली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून चव्हाण बोलत होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध नगर परिषदांमध्येही भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता संघटनवाढीवर अधिक भर द्यावा, असे चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील तरुणांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न
बैठकीत आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील स्थानिक तरुणांना शासकीय भरतीमध्ये अधिकाधिक संधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली.
“शासकीय भरतीमध्ये कोकणातील स्थानिकांना प्राधान्य मिळाल्यास बंद असलेली घरे पुन्हा उघडतील आणि रोजगारासाठी तरुणांना स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही,” असे जठार यांनी सांगितले.
कोकणातील तरुणांना शासकीय तसेच खासगी क्षेत्रात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत ठराव मांडण्यात आला. या ठरावाला उपस्थितांनी एकमताने मंजुरी दिली.
SIR प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी SIR प्रक्रियेची माहिती देत मतदार यादीत अद्याप नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांनी ती दाखल करून घ्यावीत, असे आवाहन केले.
SIR प्रक्रियेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जातीनिशी लक्ष घालून काम करावे, असेही डावखरे यांनी सांगितले.
रत्नागिरीत ‘शत प्रतिशत भाजप’चा निर्धार
भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यात भाजपचे प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडल्याची माहिती दिली. प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रशिक्षण घेतले असून आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यात ‘शत प्रतिशत भाजप’चे लक्ष्य गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, माजी आमदार डॉ. विनय नातू, आमदार निरंजन डावखरे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बिजली खान, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.




