
महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जागीच ठार
नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे अशोक चव्हाण प्रकरणावरुन एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय निर्माण होत आहे. त्यामुळे, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यां यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजित दादांच्या अपघातापूर्वीचे CCTV फुटेज समोर येऊ शकले नाही, त्यामुळे जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात? या मागील खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारचं नाही, अशीही खंत आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली.
जितेंद्र शेळके यांची दोन दिवसापूर्वी चौकशी होते, आज चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेलं? याचं खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंका असल्यासं मिटकरी यांनी म्हटलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
”जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर 2 पोज़िशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर ह्याच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते, विशेष म्हणजे 3 दिवसापूर्वी त्यांची ED चौकशी झाली आणि आज ते अपघातात वारले? हा अपघात असूच शकत नाही,” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. त्यामुळे, आता या अपघाताची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
रोहित पवार यांनीही व्यक्त केला संशय
दरम्यान, रोहित पवार यांनीही ट्विट करुन शंका उपस्थित केली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरातचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेकबाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असेही रोहित पवार यांनी म्हटले.




