
आंबा घाटात एसटी-एर्टिका समोरासमोर धडक; ५ जखमी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात आज सकाळी सुमारे ९:४० वाजता भीषण अपघात झाला. घाटातील दक्खन बस थांब्याजवळ एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण ५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे एसटी बस (MH 14 BT 2753) घेऊन खडीकोळवणहून साखरपाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे एर्टिका कार (MH 11 DZ 0329) घेऊन रत्नागिरीहून साताऱ्याकडे जात असताना दक्खन बस थांब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे, प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खाडिकोळवण), तसेच कारमधील संतोष पवार, शंभुराज शिवाजी पवार (वय १३) आणि श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनांतून बाहेर काढून तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.




