विक्रमी मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९१.७८, तर तमिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदान!!


मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल फेरतपासणी’ (एसआयआर) मोहिमेंतर्गत मोठ्या संख्येने नावे वगळल्याच्या तक्रारींनंतर घेण्यात आलेल्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत गुरुवारी विक्रमी मतदानाची नोंद झाली.

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९१.७८ टक्के मतदान झाले, तर तमिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदान झाले. दोन्ही राज्यांमध्ये मतदान केंद्रांसमोर दिवसभर रांगा लागल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, तर तीन उमेदवारांवरही हल्ला करण्यात आला.

२९४ सदस्य संख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेतील १५२ मतदारसंघांमध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजता कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत १६७ महिलांसह १,४७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजप यांच्यातील अत्यंत चुरशीच्या लढतीतील निर्णायक फेरी मानल्या जाणाऱ्या या मतदानात, मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगांमधून मतदारांचा जोरदार सहभाग दिसून आला.

पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८२.३० टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात भरघोस वाढ झाली असून हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान मानले जात आहे. सर्वाधिक मतदान दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात ९३.१२ टक्के झाले. कूचबिहार (९२.०७ टक्के), बिरभूम (९१.५५ टक्के) आणि मुशिदाबाद (९१.३६ टक्के) या जिल्ह्यांतही मतदानाच्या टक्केवारीने नव्वदी ओलांडली.

विश्लेषकांच्या मते, मतदानाचा हा टक्का वाढलेली राजकीय एकजूट आणि एसआयआर योजनेचा सांख्यिकीय परिणाम दर्शवतो. या योजनेअंतर्गत राज्यभरातील मतदारयादीतून ९१ लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली होती.

तमिळनाडू राज्यातही मतदारांचा भरघोस प्रतिसाद दिसून आला. दक्षिण भारतातील या राज्यात ८४.४१ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या राज्यात २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ७८.२९ टक्के मतदानाची नोंद झाली होती, ज्यामध्ये अण्णा द्रमुकने एकतर्फी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी हा विक्रम मोडीत काढला. २३४ मतदारसंघ असलेल्या या राज्यात द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखाली रालोआ यांच्यात लढत आहे.

तमिळनाडूमध्ये सर्वाधिक मतदान सेलम जिल्ह्यात ८८.०२ टक्के झाले. चेन्नईमध्ये ८१.३४ टक्के, मदुराईमध्ये ७७.८९ टक्के, कोईम्बतूरमध्ये ८२.३३ टक्के मतदान झाले.

या राज्यात ऑक्टोबर २०२५ मध्ये ६.४१ कोटी मतदारसंख्या होती. मात्र ‘एसआयआर’ योजनेमुळे अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मतदारसंख्या ५.७३ कोटी झाली. २०२१ च्या निवडणुकीत सुमारे ६.२९ कोटी मतदारांची नोंदणी होती. मात्र यंदा ही संख्या ५६ लाखांनी कमी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button