रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना ‘इको’ सुविधा उपलब्ध होणार; ५ कोटींच्या प्रकल्पाला गती!भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश*


कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सात प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर आधुनिक सोयी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, ५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातील उर्वरित ४ कोटींचा निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय ३१ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पातून ‘सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर’ आणि ‘चेंजिंग रूम’ उभारण्यात येणार आहेत. एकूण १३ इको टॉयलेट युनिट्स आणि १३ चेंजिंग रूम्सची निर्मिती होणार असून, समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता आणि पर्यटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता साधण्यावर भर देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, गणपतीपुळे, गणेशगुळे, गावखडी, तसेच गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर आणि दापोलीतील लाडघर व मुरुड या सात किनाऱ्यांवर ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सुविधा उभारल्या जाणार आहेत. या योजनेसाठी एकूण ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता, तर उर्वरित ४ कोटी रुपयांचा निधी आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने कामे विहित अटींनुसार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील पर्यटन पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा असून, स्वच्छता व सोयीसुविधांच्या दृष्टीने किनाऱ्यांना नवे रूप मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button