
रत्नागिरीत पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई
रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने व कोकण नगर चौकीचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी शहरात गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने शहरात गावठी हातभट्टी दारू विरोधी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी, अंमलदार यांना दिल्या होत्या. त्यानुसार रोजनिहाय गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांची गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम सुरू होते.
आज (३० एप्रिल) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक तानाजी पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व पोलीस अंमलदार हे शहर परिसरात गस्त घालत असताना शीळ – मिरजोळे परिसरात स्वरूपानंद सुभाष कदम (वय ३० वर्षे रा. शीळ कदमवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा त्याठिकाणी दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला जागीच थांबवून त्याची चौकशी आणि त्या ठिकाणाची पाहणी केली असता संशयीत गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले.
स्वरूपानंद कदम याच्या ताब्यातील ८९ हजार रुपये किंमतीचा गुळ, नवसागर मिश्रीत तयार केलेले कुजके रसायन व गावठी हातभट्टी दारू हा मुद्देमाल जप्त करून त्याचा नाश करण्यात आला. याप्रकरणी अधिक अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उप निरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, राजेंद्र सावंत, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अमिता पाटील, हेड कॉन्स्टेबल उमेश पवार, भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे, निलेश शिंगवे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.



