रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाला गती मिळणार, जिल्ह्यातच मिळणार आता जागतिक दर्जाचे उपचार


कोकणातील मध्यवर्तीं भागात आरोग्य सुविधांच्या अभावाबाबत वारंवार होणार्‍या तक्रारींना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीकडून तब्बल ३,७०८ कोटी रुपयांचे अर्थसाह्य स्वीकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाला गती मिळणार आहे.
आरोग्य सेवा वितरण, वैद्यकीय शिक्षण आणि नर्सिंग प्रणाली बळकटीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारत-जपान शैक्षणिक आदान-प्रदान कार्यक्रम. याअंतर्गत डॉक्टर, प्राध्यापक आणि नर्सिंग कर्मचार्‍यांना प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जपानच्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आणि कार्यपद्धतीचा अनुभव स्थानिक मनुष्यबळाला मिळणार असून, त्याचा थेट लाभ रुग्णांना होणार आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणारे हे आर्थिक बळ केवळ पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न राहता आरोग्य क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणणारे ठरणार आहे. सुसज्ज रुग्णालय, आधुनिक प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित कर्मचारी यामुळे रत्नागिरीचे हे महाविद्यालय भविष्यात कोकण विभागातील एक प्रमुख आरोग्य केंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button