
रखडलेल्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याला अखेर गती; ग्रामस्थांच्या इशार्यानंतर काम सुरू
मिर्या परिसरातील रखडलेले धूपप्रतिबंधक बंधार्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या उपोषणाच्या इशार्यानंतर सुरू करण्यात आले आहे. जयहिंद चौकासमोर ’बसरा स्टार’ हे मालवाहू जहाज अडकल्यामुळे सुमारे ३०० मीटरचा टप्पा दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. जहाज हटविल्यानंतरही काम सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली होती.
पावसाळा तोंडावर आलेला असताना बंधार्याचे अपूर्ण काम धोकादायक ठरू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. या भागातून समुद्राचे पाणी थेट मानवी वस्तीत घुसण्याचा धोका असल्याने नागरिकांनी पतन विभागाकडे निवेदन देऊन तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने उपोषणाचा इशारा देण्यात आला आणि त्यानंतरच कामाला सुरुवात झाली.
दरवर्षी पावसाळ्यात मिर्या येथील धूपप्रतिबंधक बंधार्याचा प्रश्न गंभीर बनतो. उधाणाच्या भरतीमुळे बंधार्याचे नुकसान होत असून प्रचंड लाटांमुळे समुद्राचे पाणी
वस्तीमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या वातावरणात रात्र जागून काढावी लागते. या पार्श्वभूमीवर सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या बंधार्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून आतापर्यंत सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
जयहिंद चौक ते पांढरा समुद्र या दरम्यानचा ३०० मीटरचा भाग ’बसरा स्टार’ जहाजामुळे अडथळ्यात होता. अनेक प्रयत्नांनंतर हे जहाज भंगारात काढण्यात आल्याने हा भाग मोकळा झाला. तरीही काम सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप वाढला होता.
दरम्यान, आता कामाला पुन्हा सुरुवात झाली असली तरी ते योग्य पद्धतीने आणि दर्जेदार व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकार्यांनी स्वतः भेट देऊन पाहणी करावी आणि ठेकेदाराला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणताही अधिकारी पाहणीसाठी आलेला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.www.konkantoday.com




