महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षाची सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा,माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची लॉटरी लागली


महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीकरिता भारतीय जनता पक्षाने सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. जाहीर केलेल्या यादीत प्रादेशिक समतोल राखत (कोकण-विदर्भ-उत्तर महाराष्ट्र-मराठवाडा) सामाजिक समतोल राखण्याचेही अवघड आव्हानही भाजपने पेलले.विशेष म्हणजे महिला आरक्षणाची चर्चा देशभर होत असताना भाजपने सहा उमेदवारांपैकी दोन महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे केशव उपाध्ये आणि माधव भंडारी या भाजपच्या निष्ठावंतांच्या पदरी निराशा पडलेली आहे. भाजपच्या यादीचे वैशिष्ट्ये म्हणजे मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यादीत झुकते माप मिळाले आहे.

प्रमोद जठार

कोकणाच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची लॉटरी लागली असून भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच नावांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार रविंद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी पराभव करत प्रमोद जठार कणकवलीतून विधानसभेत पोहोचले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नीतेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जठार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळत संघटनात्मक कामकाजात सक्रिय भूमिका बजावली. आता विधानपरिषदेत त्यांच्या रूपाने कोकणाला पुन्हा एक प्रतिनिधित्व मिळणार असून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

माधवी नाईक

भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेकरिता सरचिटणीस माधवी नाईक यांचे नाव दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. अपेक्षेप्रमाणे उमेदवार यादीत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. माधवी नाईक या ठाण्याच्या रहिवाशी असून राज्यस्तरीय तसेच ठाणे भाजप संघटनेत त्या सक्रिय असतात. आतापर्यंत त्यांनी विविध आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन महिला शक्तीची ताकद दाखवली. तसेच पक्षाच्या धोरणांचा आक्रमकपणे प्रचार प्रसार करण्याचे काम माधवी नाईक यांनी केले.

विवेक कोल्हे

अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात कोल्हे घराण्याचे नाव मोठे आहे. शंकरराव कोल्हे यांचे नातू, स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव युवा नेते विवेक कोल्हे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा लढविण्यासाठी ते आग्रही होते. मात्र, त्यावेळची राजकीय समीकरणे पाहता पक्षाने त्यांची समजूत घालून त्यांना निवडणूक न लढण्याचे सांगितले. विशेष म्हणजे, खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नेऊन पक्षाची भूमिका त्यांना पटवून देण्यात आली होती. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत त्यावेळी कोल्हे यांनी माघार घेतली होती, ज्याचे फळ आता त्यांना मिळाले आहे.

सुनील कर्जतकर

सुनील कर्जतकर हे भाजपचे ज्येष्ठ आणि संघटनात्मक कामात सक्रीय असणारे नेते आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. संघटनेतील त्यांचे योगदान पाहून भाजपने त्यांना विधान परिषदेचे तिकीट जाहीर केले आहे.

विदर्भातून संजय भेंडे यांना संधी

संजय भेंडे हे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले ते नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर मनपा निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. ओबीसी चेहरा म्हणूनही भाजपने त्यांचे नाव पुढे केल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत नितीन गडकरींचे निवडणूक प्रमुख ते काम करतात. पक्षशिस्त, पक्षनिष्ठा पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. संयमी, उच्चशिक्षित,सहकार क्षेत्रात त्यांचे चांगले कार्य आहे.

प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपने विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. काँग्रेसने संधी दिल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाही सातव यांनी राजीनामा दिल्याने देशभर त्यांची चर्चा झाली. काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद जाऊ नये, याकरिता सातव यांना भाजपने गळाला लावल्याची चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button