
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, मुंबईत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; त्या १२ तासांत काय घडलं? डॉक्टर काय सांगतात?
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री येथील एका कुटुंबात बिर्याणीची पार्टी झाली. त्यानंतर कुटुंबाने गोड पदार्थ म्हणून कलिंगड खाल्ले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना त्रास होऊ लागला. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. या घटनेत कुटुंबातील चार जणांचा एकमागून एक मृत्यू झाला. अन्नातील विषबाधेमुळे हे मृत्यू झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बिर्याणीची मेजवाणी जीवावर बेतली?
मोबाइल ॲक्सेसरीजचे दुकान चालवणारे अब्दुल्ला कादर (वय ४०), त्यांची पत्नी नसरीन (वय ३५), दोन मुली आयेशा (१६) आणि झैनब (१३) हे इतर पाच नातेवाईकांबरोबर शनिवारी रात्री मेजवाणीसाठी एकत्र आले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर ते पायधुनी येथील त्यांच्या घरी परतले.
रात्री घरी जाईपर्यंत त्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. घरी पोहोचल्यानंतर रात्री १ वाजता कुटुंबातील सदस्यांनी कलिंगड खाल्ले. पहाटे ५ वाजता कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्या आणि अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली. चौघांची अवस्था इतकी वाईट झाली की, त्यांना उठताही येत नव्हते.
शेजाऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत असलेल्या डॉ. कुरेशी यांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी परिस्थिती पाहून प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लहान मुलगी झैनबचा रविवारी सकाळी १०:१५ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशाही उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. थोड्या वेळाने त्यांचाही मृत्यू झाला. रात्री १०.३० वाजता कुटुंबातील प्रमुख अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला.
डॉक्टर झियाद कुरेशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चौघांचीही प्रकृती खूपच खालावली होती. उलट्या आणि अतिसारामुळे ते खूपच थकलेले दिसत होते. मी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांनी रात्री काय खाल्ले होते, याची विचारपूस केली असता ते म्हणाले की, त्यांनी रात्री कलिंगड खाल्ले होते.
रुग्णालयात अब्दुल्ला यांनी काय सांगितले?
अब्दुल्ला यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुद्ध आली होती. तेव्हा त्यांना रात्री काय झाले? याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी रात्री ९ जणांनी बिर्याणी खाल्ल्यापासूनचा पुढील घटनाक्रम कथन केला. अब्दुल्ला यांनी मृत्यूपूर्वी दिलेला जबाब महत्त्वाचा मानला जात असून पोलीस त्याअनुसार तपास करत आहेत.
कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू होऊ शकतो?
या घटनेमुळे अन्नातून होणाऱ्या विषबाधा प्रकरणात चिंता व्यक्त केली जात आहे. पोषणतज्ज्ञ रुपाली दत्ता यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत याबद्दलची अधिक माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, कलिंगडमध्ये पाणी आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यात जर भेसळ असेल तर जिवाणूंची झपाट्याने वाढ होऊ शकते.
कलिंगडमध्ये गोडवा वाढावा यासाठी त्यात ग्लुकोजचे पाणी आणि साखरेचे पाणी इंजेक्शनद्वारे टोचले जाते, अशा बातम्या अधूनमधून समोर येतात. रुपाली दत्ता म्हणाल्या की, अशाप्रकारे जर भेसळ केली जात असेल तर जिवाणूंची वाढ झपाट्याने वाढू शकते.
आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा यांनीही एनडीटीव्हीला कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊ शकते का? याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, जेव्हा एखाद्या फळाला साल्मोनेला संसर्ग, लिस्टेरियोसिस यासारख्या रोगजंतूचा संसर्ग होतो, तेव्हा अशी फळे खाल्ल्यामुळे डीहायड्रेशन किंवा इतर आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.
कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती?
कलिंगड किंवा कोणतेही फळ खाण्याची उत्तम वेळ कोणती? याबाबतही दत्ता यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, कलिंगड खाण्याची उत्तम वेळ ही सकाळी किंवा दुपारच्या जेवणा दरम्यान असू शकते. रात्री उशिरा फळ खाल्ल्याने आपोआप विषबाधा होत नाही. पण जर फळ दूषित असेल किंवा ते पचविण्याची शरीराची क्षमता कमी असेल तर मात्र त्रास होऊ शकतो.
संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू
पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून चौघांचेही शवविच्छेदन करण्यात आले आहे. १२ तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील चौघाही सदस्यांचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे पोलिसांनी घरातून अर्धवट खालेल्या कलिंगडाचे तुकडे ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
मुंबई पोलिसांचे पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंडे यांनी सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान चौघांच्या शरीरातून जे नमुने (व्हिसेरा) संकलित करण्यात आले आहेत, ते रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी फॉरेन्सिक आणि अन्न विभाग संयुक्तपणे चौकशी करत आहे. कुटुंबातील सदस्यांनी खालेल्या कलिंगडमध्ये काही बाह्य विषारी पदार्थ किंवा भेसळ होती का? याचाही तपास राज्याचा अन्न व औषध प्रशासनाकडून केला जात आहे. तर फॉरेन्सिक विभाग बिर्याणीच्या नमुन्याचा आणि शवविच्छेदनाच्या माध्यमातून मिळालेल्या अहवालाच्या आधारे मृत्यूच्या कारणांचा शोध घेणार आहे.




