दादरमध्ये महाराष्ट्र परिषदेचा एल्गार, बंद गाड्या सुरू करा अन्यथा आंदोलन


महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या, रखडलेले रेल्वे प्रकल्प, बंद गाड्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय आवाज बुलंद करण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परिषदेत संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद साधण्यात आला. मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच राज्यातील इतर भागांतील रेल्वे प्रवासातील अडचणी, गाड्यांची कमतरता, तांत्रिक अडथळे, रखडलेले प्रकल्प आणि प्रवासी सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर सखोल मंथन करण्यात आले.
बंद ३० गाड्या तातडीने सुरू करण्याची मागणी कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह तब्बल ३० गाड्या तातडीने पूर्ववत कराव्यात, अशी जोरदार मागणी परिषदेतून करण्यात आली. तसेच नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुण्यापर्यंत वाढवण्याची मागणीही प्रशासनासमोर ठेवण्यात आली.
कोकण रेल्वे दुहेरीकरणासह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा आग्रह कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली दहा वर्षे रखडलेली असून ती तातडीने पूर्ण करावी, अशी भूमिका परिषदेत मांडण्यात आली. याचबरोबर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण, तसेच सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड-परळी, जालना-जळगाव या नव्या रेल्वेमार्गांच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.
प्रवासी सुरक्षेसाठी विशेष उपाययोजनांची गरज
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक दक्षता, स्वच्छता, स्थानकांवरील सुविधा, तांत्रिक अडचणींचे निराकरण आणि प्रशासनाशी त्वरित संवाद यावरही भर देण्यात आला. प्रलंबित तांत्रिक मागण्यांचा तातडीने पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

खासदार विनायक राऊत व अरविंद सावंत यांचा पाठिंबा

या परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोन्ही नेत्यांनी रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवित रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे यासंदर्भात प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी दादर- रत्नागिरी, मुंबई-सावंतवाडी, मुंबई-पंढरपूर, नांदेड-पुणे या गाड्यांबाबत मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मेनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुन्हा दिला. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यभरातील ३० हून अधिक संघटनांचा सहभाग

या परिषदेला कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई महानगर परिसरातील रेल्वे व प्रवासी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ३० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संघटनांनी एकत्र येत रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी संयुक्त लढा उभारण्याचा निर्धार केला.
या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक व्यापक आणि प्रभावी व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त होत असून आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button