ठाकरे शिवसेनेची रत्नागिरी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्नबाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त भव्य उपक्रमांचे नियोजन

lरत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आगामी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यात विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांची मोठी आखणी करण्यात आली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुका कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला शिवसेना उपनेते बाळ माने यांनी विशेष उपस्थिती लावून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुकाप्रमुख मयुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. “नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करताना केवळ कार्यालयात बसून निर्णय न घेता, प्रत्यक्ष विभागात जाऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल आणि त्यानंतरच नियुक्त्या केल्या जातील,” असे धोरण मयुरेश पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदार वारेकर यांची ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आगामी काळात शिवसैनिकांना सक्रिय करण्यासाठी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांची रूपरेषा यावेळी निश्चित करण्यात आली.
बैठकीस उपतालुकाप्रमुख विजय देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष रहाटे, दीपक सुर्वे, महिला संघटक ममता जोशी, समिधा भाटकर, युवा सेना तालुकाप्रमुख युक्ता आंबेकर, विभाग प्रमुख किरण तोडणकर यांच्यासह रत्नागिरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button