
गिम्हवणेत दोन फ्लॅट फोडून ५.२३ लाखांचा ऐवज लंपास
दापोली तालुक्यात गिम्हवणे येथे झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये ५ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिम्हवणे एकतानगर भागामधील चिरायू विनायक अपार्टमेंट येथील सुरेश दत्तात्रय परब यांच्या बंद घरामध्ये १८ एप्रिल रोजी रात्री २ ते ३.३४ या कालावधीत ३ अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करून घरामधील ३८ हजार रुपये किमतीचे चांदीचे व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सुरेश परब यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कमलाकर शांताराम मिरजुळकर यांच्या निसर्ग रेसिडेन्सी इमारतीमधील दुसर्या मजल्यावरील बंद घराच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचा लॉकर तोडून त्या लॉकरमधून ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रुपये १५ हजार चोरून नेले. ही चोरी १२ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १३ एप्रिल रोजी दुपारी २ च्या दरम्यान केली असल्याची तक्रार मिरजुळकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
www.konkantoday.com




