खताची टंचाई भासू नये म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात खतांसाठी ’स्मार्ट प्लॅनिंग’


आगामी खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषि विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. हंगामादरम्यान कोणतीही टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
जिल्ह्यातील मागणी लक्षात घेऊन युरिया, डीएपी, एनपीके, एसएसपी तसेच संयुक्त खतांचे पुरेसे आवंटन करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या सरासरी वापराचा विचार करून यंदाही खतांचा आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शेतकर्‍यांना अडचण येऊ नये यासाठी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात २३ ठिकाणी ’बफर स्टॉक’ ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ६५० मे.टन युरिया व ५ मे.टन डीएपी खताचा समावेश असून, त्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर खत उपलब्ध होणार आहे.
खतांबरोबरच बियाण्यांच्या पुरवठ्याचेही नियोजन करण्यात आले असून, शासकीय व खासगी संस्थांमार्फत दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कृषि विभागाने शेतकर्‍यांना माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहून उत्पादन खर्चात बचत होईल आणि उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कृषि निविष्ठा विक्रेत्यांना जादा दराने किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची
विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खतांची साठेबाजी, काळाबाजार किंवा जादा दराने विक्री आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्रमांक ८८३०२६४३३५ सुरू करण्यात आला असून, शेतकर्‍यांनी कोणतीही अडचण असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button