
कोकणचा साज संगमेश्वरी बाज’चागुरुवारी संगमेश्वरमध्ये ६०० वा प्रयोग
कोकणातील विदारक वास्तव मांडणारे लोकनाट्य : पारंपरिक लोककलांचे उत्कृष्ट सादरीकरण
रत्नागिरी : कोकणातील लोककलांचे पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करत विनोदी ढंगाने विदारक परिस्थितीवर भाष्य करीत समर्थ कृपा प्रॉडक्शन निर्मित ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. या लोकनाट्याचा गुरुवारी संगमेश्वर मधील गणेशआळी येथे ६०० वा प्रयोग रंगणार आहे.
कोकणची सध्याची ज्वलंत समस्या रिकामी होत चाललेली घरे, वस्त्या. येथील कमावते तरुण हात गाव सोडून मोठ्या शहरांची वाट धरताना दिसतात आणि कोकणात परप्रांतीय येऊन येथील कामे, सेवा करतात. येथील जमिनी परप्रांतियांनी बळकावल्या आहेत. या विदारक परिस्थितीवर भाष्य करीत ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. कोकणातील मोठा समुदाय मुंबईत आहे. लोककलांचे दस्तावेजीकरण करणारा चाकरमानी कोकणात येतो. येथील लोककलांचा एकेक प्रकार चित्रित करता करता संपूर्ण कोकण त्याच्या डोळ्यासमोर उभे राहते. लोककलांची परंपरा भजन, जाखडी, नमन, पारावरचे नाटक यातून एक कोकणी सामाजिक वास्तव उभे राहते. विनोदी बोचऱ्या पद्धतीने भाष्य करता करता हे लोकनाट्य नेमक्या समस्येवर जाऊन ठेवते. आजवर मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड यासह रत्नागिरी जिल्ह्यात या लोकनाट्याचे प्रयोग झाले आहेत. लोककलांचा धांडोळा घेत त्या रंगमंचावर मांडत कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वृत्तीही या नाटकातून मांडली जाते. खास खवचट कोकणी विनोद आणि स्वतःवर हसण्याची खास वृत्ती अशा कोकणी प्रवृत्तीचे आणि इरसाल नमुन्यांचे दर्शन यातून घडते.
सुनील बेंडखळे, सचिन काळे, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण, रवींद्र गोनबरे, अंकुश तांदळे, अनिकेत गोनबरे, विश्वास सनगरे आदींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या लोकनाट्याचा पारंपरिक लोकसंगीत हाही एक कणा आहे. कोकणातील विविध गीतप्रकारांचे अत्यंत सुमधूर सादरीकरण ही याची जमेची बाजू आहे. मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, अभिषेक भालेकर, स्वप्नील सुर्वे, गंधार मोरे, आणि विवेक शिलकर या वाद्यवृंदाद्वारे कोकणातील सुमधूर लोकगीतांचा आस्वाद रसिकांना मिळतो. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या लोकनाट्याचा गौरव अनेक संस्थांनी केला असून अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात सिने-नाट्य कलावंतांसमोर झालेल्या सादरीकरणानंतर सर्वांनीच कौतुकाची थाप दिली आहे. संगमेश्वर-गणेशआळीत गुरुवारी रात्री दहा वाजता होणाऱ्या या सहाशेव्या प्रयोगाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन समर्थ कृपा प्रॉडक्शनतर्फे करण्यात आले आहे.




