
एकजूट होऊ या.. कर्करोगाला हरवूया..विशेष कर्करोग तपासणी मोहीम
आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देत आहोत. सध्या जगभरात असंसर्गजन्य आजारांचा विळखा वाढत असून, एकूण मृत्यूंपैकी तब्बल ६३% मृत्यू हे याच आजारांमुळे होत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, यामध्ये कर्करोगाचा (Cancer) वाटा ९% इतका आहे. Globocan २०२० च्या आकडेवारीनुसार, भारतात कर्करोगाचे १३ लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत.
राज्याचा विचार करता मुख कर्करोग (Oral Cancer), स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) आणि गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हे तीन प्रकार सर्वाधिक आढळतात. मात्र, ‘वेळेत निदान’ हेच या रोगावरील सर्वात प्रभावी शस्त्र आहे.
वाढत्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन
०८ एप्रिल २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन’ फिरणार आहे.
कॅन्सर व्हॅनचा तालुकानिहाय प्रवास
संगमेश्वर-८ एप्रिल ते ११ एप्रिल
चिपळूण-१३ एप्रिल ते १६ एप्रिल
खेड-१७ एप्रिल ते २० एप्रिल २०२६
मंडणगड-२१ एप्रिल ते २२ एप्रिल
दापोली-२३ एप्रिल ते २५ एप्रिल
गुहागर-२७ एप्रिल ते २९ एप्रिल
रत्नागिरी-३० एप्रिल ते ०४ मे
लांजा – ५ मे ते ७ मे
राजापूर – ८ मे ते ११ मे
तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी: या फिरत्या वाहनामध्ये दंतशल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध असतील.
मोफत सेवा: मुख, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी पूर्णपणे मोफत केली जाईल.
प्राथमिक उपचार आणि संदर्भ सेवा: रुग्णांचे वेळेत निदान करून त्यांना प्राथमिक उपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे.
कर्करोग हा नाव ऐकताच भीती वाटणारा आजार असला, तरी तो पहिल्या टप्प्यात ओळखला गेल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेकदा माहितीचा अभाव किंवा तपासणीसाठी शहरात जाण्याचा कंटाळा यामुळे आजार बळावतो. आता शासन स्वतः आपल्या दारी ही सेवा घेऊन आले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या सेवासुविधांचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील महिलांना आणि ज्येष्ठांना या मोहिमेबद्दल माहिती द्या. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. कर्करोगाविषयी आरोग्य सल्ला मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 104 डायल करा.
चला, आपण सर्वांनी मिळून कर्करोगमुक्त समाज घडवूया!
-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




