शिक्षकांनी संस्कृत भाषा शास्त्रीय पद्धतीने शिकवणे आवश्यक

संस्कृतभारती गीताशिक्षण केंद्रप्रमुख शिरीष भेडसगावकर यांचे प्रतिपादन

रत्नागिरी :
आज शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो. ही मुळात कौतुकास्पद बाब आहे. मात्र मुलांना या संस्कृत भाषेचे शास्त्रीय पद्धतीनुसार शिक्षकांनी ज्ञान देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्कृतभारती गीताशिक्षण केंद्रप्रमुख शिरीष भेडसगावकर यांनी केले.

ते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने व संस्कृत विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त) आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व संस्कृत शिक्षक मंडळ रत्नागिरी जिल्हा यांच्या सहयोगाने आयोजित एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्य अतिथी रूपाने बोलत होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.

यावेळी मुख्य अतिथी रूपाने बोलताना श्री भेडसगावकर म्हणाले की, या कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या शाळांतून जमलेले शिक्षक संघटित आहेत कार्यरत आहेत ही संस्कृतच्या भवितव्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळे संस्कृत शिक्षकांसाठी हे रत्नागिरी मॉडेल आदर्शवत होऊ शकते.
पुढे ते म्हणाले की, संस्कृत भाषा शास्त्रीय पद्धतीने अध्यापनात वापरणे महत्त्वाचे आहे. या शास्त्रीय पद्धतीत पहिली पायरी श्रवण आहे आणि नंतरची भाषण आहे त्यामुळे परस्परपूरक असलेली ही तत्वे भाषिक संपादणूकीसाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ कल्पना आठल्ये यांनी कार्यशाळेचे महत्व विषद केले.

यावेळी संस्कृतभारती गीता शिक्षण केंद्राचे प्रमुख शिरीष भेडसगावकर , गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथील संस्कृत विभागप्रमुख आणि कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ कल्पना आठल्ये, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई आणि रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक, उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button