
चारशेहून अधिकमहिला शंख वादकांचा अनोखा विश्वविक्रम, देशातील पहिल्या केशव शंखनाद पथकाचा अभिनव उपक्रम!
Conch playing : महिला शक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा गौरव करण्यासाठी पुण्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ तब्बल चारशेहून अधिक महिला शंख वादकांनी रविवारी एकत्रितपणे शंख वादन विश्वविक्रम केला. केशव शंखनाद पथकाच्या वतीने याचे कर्वेनगर मधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हा विश्वविक्रम साकारला गेला.
महापौर मंजूषा नागपुरे, निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेखा साळुंखे, ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’च्या (सिर्फ) संस्थापिका सुमेधा चिथडे, निवृत्त मुख्याध्यापक उमा जोशी, क्रीडापटू प्रीती म्हस्के, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या सुषमा नार्वेकर, पथकाचे संस्थापक नितीन महाजन आदी उपस्थित होते. मंजूषा नागपुरे आणि सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते पथकातील बाल महिला वादकाला पदक घालून विश्वविक्रम झाल्याची घोषणा करण्यात आली.
ओंकाराने शंखवादन विश्वविक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर शंख मंत्राचे पठण करण्यात आले. शंखावर ब्रह्मनाद, सात खंड, अर्धवलय, तुतारी, पूर्णवलय, सुदर्शन चक्र, मुक्तछंद ही सात आवर्तने सादर करण्यात आली. गजानना, श्री दत्त, श्री राम जयराम हे तीन मंत्र घोष शंखावर सादर करण्यात आले. त्यानंतर सादर झालेली शंख, डमरू आणि संबळाची जुगलबंदी उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली.
उपक्रमासाठी पथकाने एक महिला समिती तयार केली होती त्यामध्ये महिला प्रमुख शीला गिरमे यांच्या समवेत विजया कापसे, संगीता रेडे, लीना पंजाबी, शालन चव्हाण, संगीता भिडे, वीणा झिरपे, अनुजा कुलकर्णी, अमृता सागर, अनिता डोमाळे, राखी इंगळे, गायत्री मढीकर, जोती संगमनेरकर, वृषाली धोडगे, शीतल नाईक, वैष्णवी सराफ आणि गार्गी साळुखे यांचा सहभाग होता. आदिती दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. संयोगिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया सराफ यांनी आभार मानले.
स्त्रियांना यापूर्वी संघर्ष होता. त्यांना सन्मान मिळावा, यासाठी झटणारे अनेक महामानव आणि योगिनी होऊन गेल्या. महिलांनी सक्षम होण्यासाठी केवळ शिक्षित होणे महत्त्वाचे नाही तर सुशिक्षित होणे गरजेचे आहे. शंख वादन आणि महिला हा विषय पूर्वी नव्हता. आता शंखवादन पथकाच्या माध्यमातून आजच्या आणि पुढच्या पिढीला हे पाहायला मिळणार आहे.- मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे




