
चिपळूण तालुक्यात दोन महिन्याने सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाला म्हातारचळ, शिक्षकावर ऍट्रॉसिटीसह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील एका शिक्षकाने दोन महिलांचे फाटो ’मॉर्फ’ करून ते अश्लिल अवस्थेत तयार केले. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीशी देखील गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली आहे. शिक्षकावर पोक्सोसह ऍट्रोसिटी तसेच माहिती व तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग गोविंद डाकरे (५७, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद त्या महिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डाकरे हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हा शिक्षक दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होता. २० जानेवारी रोजी त्याने दोन महिलांचे वाईट उद्देशाने फोटो मॉर्फ करून ते अश्लिल अवस्थेत तयार केले. त्यामध्ये पालक महिलेचा देखील समावेश आहे. याबरोबरच त्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी देखील गैरवर्तन केले. हा प्रकार पालकांसह ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाला त्यांनी जाब विचारला. यानंतर याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात पोक्सोसह ऍट्रोसिटी तसेच माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले करीत आहेत.




