
६४ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा रत्नागिरीत उत्साहात प्रारंभ
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ च्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरी येथे दिमाखात पार पडला. राज्यनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी गेल्या ६४ वर्षांत प्रथमच रत्नागिरीत होत असल्याने नाट्यकर्मी आणि रसिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
उद्घाटनाची सुरुवात राज्य गीत व भूतपूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन, नटराज पूजन व श्रीफळ अर्पण करून स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ झाला. या वेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखाध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास जोशी, सेन्सॉर सदस्य राजेश गोसावी तसेच परीक्षक संजय हळदीकर, राजा अत्रे, पद्मनाभ पाठक, प्रिया नेर्लेकर, मंगेश नेहरे आणि सांस्कृतिक कार्य प्रतिनिधी मिलिंद शिंदे उपस्थित होते.
स्पर्धेबाबत माहिती देताना समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिषजी शेलार, विभागीय सचिव व संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून राज्यभरातून निवड झालेले ४८ पारितोषिकप्राप्त नाट्यसंघ अंतिम फेरीत सहभागी झाले आहेत. रत्नागिरीत अंतिम फेरी व्हावी यासाठी पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत यांनी विशेष प्रयत्न केले, असे समीर इंदुलकर यांनी नमूद केले.
उद्घाटनानंतर अमरहिंद मंडळ, दादर निर्मित ‘रेशनकार्ड’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात झाली. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रथमेश पवार यांचे नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी केले.




