
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ०१ जुलै, २०२६ रोजी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती दरवर्षी १ जुलै रोजी साजरी केली जाते. त्यांचे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदान लक्षात घेऊन, त्यांचा जन्मदिवस हा राज्यात ‘कृषिदिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य दिले, ज्यामुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. महाराष्ट्रात शेती संशोधनाला गती देण्यासाठी राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे चार स्वतंत्र कृषी विद्यापीठांची स्थापना त्यांच्याच काळात झाली. महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक आणि सामाजिक विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील अधिकारी/कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.




