
नानासाहेब जोशी मार्गाच्या नामफलकाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण

चिपळूण : चिपळूणच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी आमदार, दैनिक ‘सागर’चे संस्थापक-संपादक कै. निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांच्या स्मृतींना चिपळूण नगरपरिषदेने अभिवादन केले. नगरपरिषदेने नामकरण केलेल्या ‘दैनिक सागरचे संस्थापक-संपादक व माजी आमदार निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी मार्ग’ या मार्गाच्या नामफलकाचे अनावरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. उदय सामंत म्हणाले की, नानासाहेब जोशी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने सर्वसामान्यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न आणि लोकहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. प्रभावी पत्रकारिता करत असतानाच त्यांनी राजकारण आणि समाजकारणातही आपले स्वतंत्र व आदरणीय स्थान निर्माण केले.
नानासाहेबांचे विचार, त्यांची निष्कलंक प्रतिमा आणि जनसामान्यांशी असलेली त्यांची नाळ ही आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. नानासाहेबांसारख्या महान व्यक्तींची नावे सार्वजनिक मार्गांना दिल्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा इतिहास पुढील पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देत राहील, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला आमदार भास्करराव जाधव, चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्यासह नगरपरिषदेचे नगरसेवक-नगरसेविका आणि चिपळूणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




