चिपळूणातील ठाकरे शिवसेनेत फूट,भास्करजाधव- विनायक राऊतांमध्ये विसंवाद


चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचा उमेदवार उभा असताना या पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.आमदार जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यातील विसंवादामुळे चिपळूणमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह २४ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहे. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. या आघाडीत लक्ष घालावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे केली. त्यामुळे आमदार जाधव यांनी पहिल्या टप्यात शिवसेनेचे काही उमेदवार निश्चित केले. त्यांनी अर्जही दाखल केले. तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले रमेश कदम यांचाही अर्ज भरला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुचनेनूसार सर्वच प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच नगराध्यक्षपदासाठीही उमेदवार देण्यात आला. त्याचवेळी शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अर्ज माघारीनंतर ठाकरे सेनेचे सर्वच उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे प्रचारावेळी प्रमुख नेत्यांमधील दुरावा स्पष्ट होऊ लागलेला आहे. आम्ही ठरवून दिलेल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहोत, असा सुतोवाच आमदार जाधव यांनी केला आहे. तसेच माजी खासदार राऊत यांच्या सूचनेनूसार ज्यांनी अर्ज भरले आहेत, तिथे आमदार जाधव जाणार नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तेथील उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी खासदार राऊत यांनाच चिपळुणात यावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button