पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी ची शैक्षणिक दिनदर्शिका व वाढदिवस शुभेच्छा कार्ड चे प्रकाशन उत्साहात संपन्न

शैक्षणिक वाटचालीसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी शाळेच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष शुभेच्छा कार्डांचे अनावरण व प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पटवर्धन हायस्कूलचा हा एक अभिनव उपक्रम असून, शाळेचे संपूर्ण वार्षिक नियोजन, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, परीक्षा वेळापत्रक, महत्त्वाचे दिनविशेष आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती यांचा समावेश असलेली शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभरातील अभ्यास आणि विविध उपक्रमांचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक व प्रेरणादायी संदेशांनी सजलेले विशेष शुभेच्छा कार्ड तयार करण्यात आले असून, त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण व प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, आपलेपणाची भावना आणि शाळेशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर, कार्यवाह धनेश रायकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, विश्वस्त विनायक हातखंबकर, सहकार्यवाह श्रीकृष्ण दळी, संस्था प्रतिनिधी दादा कदम, तसेच सुनील कुष्टे, प्रवीण आंबेकर आणि सनातन रेडीज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक दिनदर्शिका व वाढदिवस शुभेच्छा कार्डांचे अनावरण व प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थीकेंद्रित अशा या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, अशा नावीन्यपूर्ण संकल्पना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी पटवर्धन हायस्कूलच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे असे उपक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले. शाळेने राबविलेला हा अभिनव उपक्रम निश्चितच इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्याशी भावनिक बंध निर्माण करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button