रत्नागिरी शहरालगतच्या फणसवळे येथे गुरांचे अवयव आढळल्याने खळबळ; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल


रत्नागिरी शहरालगतच्या फणसवळे गावात गुरांचे अवयव आढळल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्लास्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत हे अवयव सापडल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फणसवळे परिसरात चार ते पाच गुरांचे अवयव बेवारस स्थितीत आढळून आले. प्राथमिक पाहणीत या गुरांचे कातडे काढण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, नेमका प्रकार काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सापडलेले अवयव ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, संबंधितांचा शोध घेण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे.

याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांनी सांगितले की, घटनास्थळी सापडलेल्या गुरांचे कातडे काढलेले असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button