बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ऐतिहासिक चूक? देशातील पहिली मुलींची शाळा!

: महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे. परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता ३ री मधील ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा संकुचित करण्यात आला आहे. त्यावर शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे.

शिक्षक संघटनेचे नेमके म्हणणे काय?

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ही शाळा देशातील (भारतातील) पहिली शाळा आहे. तरीही या शाळेचा उल्लेख महाराष्ट्रापुरता मर्यादित करण्यात आल्याने बालभारतीची ही घोडचूक तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी बालभारतीच्या संचालिका डॉ. अनुराधा ओक यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

अशी चूक होणे खेदजनक

या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने बालभारती प्रशासनाला पाठवलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत दस्तऐवज, राष्ट्रीय स्मारकांमधील नोंदी आणि विविध प्रामाणिक संदर्भ ग्रंथांमध्ये या शाळेचा उल्लेख ‘देशातील पहिली शाळा’ असाच आहे. पाठ्यपुस्तकातील या मर्यादित उल्लेखामुळे ऐतिहासिक सत्याचा संकोच होत असून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचत आहे. बालभारतीसारख्या अग्रगण्य संस्थेकडून राष्ट्रपुरुषांच्या महान कार्याबाबत अशी चूक होणे अत्यंत खेदजनक असून, यामुळे भावी पिढीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या चुकीमुळे संपूर्ण राज्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि समाजमनात तीव्र असंतोष पसरला आहे.

शिक्षक संघटनेच्या मागण्या काय?

पाठ्यपुस्तकातील ‘महाराष्ट्रातील पहिली शाळा’ हा चुकीचा, मर्यादित उल्लेख तातडीने बदलून तिथे ‘देशातील (भारतातील) पहिली मुलींची शाळा’ अशी दुरुस्ती करण्यात यावी, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून या दुरुस्तीबाबत बालभारतीने तातडीने एक अधिकृत शुद्धिपत्रक जारी करावे, भविष्यात पाठ्यपुस्तक निर्मिती करताना अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधित समितीला अधिक सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. महापुरुषांच्या जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव पाठ्यपुस्तकात योग्य पद्धतीने झालाच पाहिजे, ही संघटनेची स्पष्ट भूमिका आहे. बालभारती प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन सदर चूक त्वरित दुरुस्त करावी अशी विनंती महेश ठाकरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button