
३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; बॅंकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती मागविली आहे.३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची व चालू बाकीदारांच्या माहितीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे ३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही तारीख निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील एक कोटी ३३ लाख ४४ हजार २०९ शेतकऱ्यांना बॅंकांनी पावणेतीन लाख कोटींचे कर्जवाटप केले. त्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ३५ हजार ४७७ कोटी रुपयांचे कर्ज मुदतीत भरलेच नाही. त्यामुळे तेवढे शेतकरी आता थकबाकीदार झाले आहेत. राज्य सरकारने २०१७ मध्ये शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची तर २०१९ मध्ये शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली. मात्र, अर्धवट कर्जमाफीमुळे ज्या शेतकऱ्यांना तेवढी रक्कम देखील भरणे अशक्य होते, त्यांना लाभ घेता आला नाही.
त्यानंतर दुष्काळ, अतिवृष्टी, महापुरामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा होईल, अशी कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी पात्र कोण, याचे निकष निश्चित करणार आहे. त्यासाठी सहकार व कृषी विभागाचे आयुक्तांचीही मदत घेतली जात आहे. सतत थकबाकीदार झालेले व आतापर्यंत कधीही थकबाकीत न गेलेले शेतकरी, दोघांचीही पीकपद्धती, या सर्व बाबींचा अभ्यास करून समिती १० एप्रिलपर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.




