
अनिल परबांना धक्का! उद्धव ठाकरेंनी विश्वासूसह 29 जणांना पक्षातून हाकललं, ‘ते’ 29 पदाधिकारी कोण? वाचा यादी.!
- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आता टीकेचे बाण सोडले जात असून, समोरील पक्षाला चक्रव्युहात अडकवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीत काही पक्षांना स्वकीयांकडूनच धक्के बसत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेना पक्षातील एकूण 29 पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनिल परब यांचे विश्वासूही आहेत.
शिवसेना युबीटीमधून पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांचे विश्वासू शेखर वायंगणकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेले ते पदाधिकारी कोण?
विभाग क्र. ३ : प्रभाग क्र. ७४ संदीप मोरे, मंदार मोरे,
विभाग क्र. ४/५ : प्रभाग क्र. ९५ – शेखर वायंगणकर,
विभाग क्र. ६ – प्रभाग क्र. १६९ – कमलाकर नाईक, प्रभाग क्र. १७० सोनाली म्हात्रे,
विभाग क्र. ७ : प्रभाग क्र. १०९ संगीता गोसावी,
विभाग क्र. ८ : प्रभाग क्र. १३१ – नीता शितोळे, प्रभाग क्र. १४२ रोहिदास ढेरंगे,
विभाग क्र. ९ : प्रभाग क्र. १४३ – सदाशिव बालगुडे, विराग पावसकर, प्रभाग क्र. १५० – विकी मोरे, प्रभाग क्र. १५५ निखिल भोईटे, प्रभाग क्र. १४६ -आनंद इंगळे, प्रभाग क्र. १४७ – विजय नागावकर,
विभाग क्र. १० : प्रभाग क्र. १८३ – रोहित खैरे, गणेश खाडे, प्रभाग क्र. १८६ – गणेश सोनवणे, चेतन सूर्यवंशी, माधुरी गायकवाड, प्रभाग क्र. १८५ – कमलेश वारीया,
विभाग क्र. ११ : प्रभाग क्र. १९३ – बाबू कोळी, प्रभाग क्र. १९७ – परशुराम (छोटू) देसाई, प्रभाग क्र. २०२ – विजय इंदुलकर, प्रभाग क्र.२०७ – रोहित देशमुख, प्रभाग क्र. २०८ – मंगेश बनसोड, प्रभाग क्र. २०३ – दिव्या बडवे,
विभाग क्र. १२ : प्रभाग क्र. २१८ -नयना देहेरकर, आरती लोणकर, प्रभाग क्र. २२५ – प्रवीण कोलाबकर.
वसई-विरार महापालिकेतीलही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हरिश्चंद्र गोविंद पाटील, दिलीप गोपाळ कुवेसकर, विश्वास भास्कर किणी, वैभव विद्याधर चेंडेकर, श्रीकांत गोपाळ महाकाळ, शैलेंद्र श्रीकांत गोळवणकर, ॲड. कल्याणी किरण पाटील, हेमलता भगत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
ठाकरे बंधू आज जाहीर करणार वचननामा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडणार आहे. यावेळी ठाकरे बंधू शिवसेना आणि मनसेचा मुंबई महानगरपालिकेसाठी संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना भवन येथे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.
राज ठाकरे 20 वर्षानंतर शिवसेना भवनात जाणार
राज ठाकरे 20 वर्षानंतर शिवसेना भवनात जाणार आहेत. ठाकरे बंधू शिवसेना भवनात एकत्र पालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. दरम्यान यावेळी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत, मनसेची स्थापन केल्यानंतर राज ठाकरे एकदाही शिवसेना भवनात गेले नव्हते मात्र, जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी
चढणार आहेत..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जवळपास 20 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत. ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर दोन्ही बांधवांनी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडत मनसेची स्थापना केली दरम्यान यानंतर अनेकदा ठाकरे बंधूंमध्ये निवडणूक एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली, मात्र, काही मुद्दयांमुळे या चर्चा नेहमीच फिस्कटत राहिल्यात, आता दोन्ही बंधूंनी ठाम निर्धार केल्यानंतर 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळे पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या तोफा चांगल्याच धडाडणार आहेत, मात्र त्याआधी 4 जानेवारीला ठाकरे बंधू जनतेसमोर जाहीरनामा मांडणार आहेत, शिवसेना भवनात हा कार्यक्रमक पार पडणार आहे.




