
आस्था सोशल फाउंडेशनचा ‘सुपर मॉम’ पुरस्कार ज्योत्स्ना कुळये यांना प्रदान
रत्नागिरी : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनी ‘सुपर मॉम’ हा पुरस्कार देण्यात येतो. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रक्कम पाच हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असते. आणि यंदाच्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत सौ. ज्योत्स्ना अजित कुळये.
त्या उमराड गुहागरच्या माहेरवाशीण व गोविळ (ता. लांजा) येथील सासरवाशीण आहेत. मात्र उदरनिर्वासाठी लग्नानंतर मुंबईला असताना २००७ साली त्यांच्या मोठ्या मुलाचा देवेशचा जन्म झाला. परंतु डॉक्टरांनी सांगितले की देवेशला मणक्याचा आजार आहे, एक दोन नाही देवेशच्या १४ छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, परंतु देवेश स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही.
मात्र ज्योत्स्ना कुळ्ये सासरच्या मंडळीच्या आधाराने खंबीर उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्याला विशेष शाळेत प्रवेश दिला, परंतु त्याची बुद्धिमत्ता चांगली असल्याने त्याला सामान्य शाळेत ज्योत्स्ना यांनी दाखल केले. रोज त्याला उचलून घेऊन जाऊन शाळेत व्हीलचेअरवर बसवायचे आणि तिथेच थांबून परत शाळा सुटली की परत घरी आणायचे. दिवसभर शाळेत बसून असल्यामुळे तेथील मुख्याध्यापिकांनी ज्योत्स्ना यांनी बालवर्गाला शिकवण्याची संधी दिली. दहावी शिक्षण झालेल्या ज्योत्स्ना यांनी त्याचेही सोने केले. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी त्या देवेश ला घेऊन रत्नागिरी गाठली. बेणी (ता. लांजा) येथील एका नर्सरीमध्ये काम करत असलेल्या पती अजित महादेव कुळये यांच्याकडे राहण्यासाठी आल्या आणि मग पुढे लॉकडाऊननंतरही त्यांनी इकडेच राहण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान देवेशला न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे प्रवेश दिला. इकडे त्याला रोज रिक्षा शाळेत ने आण करत चालू असलेल्या संघर्षाचे चीज झाले. देवेश ७४ टक्के गुण मिळवून दहावी पास झाला.
देवेशला ऐकण्याचा देखील त्रास असल्यामुळे त्यांनी अकरावी कॉमर्स ला तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. या मायलेकाच्या जिद्दीची दखल घेत, अकरावी बारावीला त्याला उडान दिव्यांग शिष्यवृत्ती मिळाली आहे. यावर्षी देवेशने बारावीची परीक्षा दिली आहे. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत आपल्या ८५ टक्के बहुदिव्यांग मुलाला जिद्द, चिकाटीने यशस्वी व स्वावलंबी नागरिक म्हणून घडवण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टाला, मातृत्वाला वंदन करत आस्था सोशल फाऊंडेशनने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन “सुपर मॉम “पुरस्कार दिला.
विशेष म्हणजे त्यांच्या सासूबाई श्रीमती मंदाकिनी महादेव कुळे यांचादेखील त्यांना खंबीर पाठिंबा आहे. या प्रसंगी “आस्था”च्या सचिव श्रीमती सुरेखा पाथरे, संकेत चाळके, हसना नेवरेकर, आल्हाद पाथरे उपस्थित होते.




