गोवंशाची वाहतूक करणारे दोघेजण रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात


रत्नागिरी : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने खानू येथे गस्तीदरम्यान गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल आनंदा सावंत (वय २३, रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) आणि त्या टेम्पोमध्ये असलेली दुसरी व्यक्ती ऋषिकेश आनंदा सावंत (वय २६, रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक, नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.

ग्रामीण पोलिसांच्या नियमित गस्तीदरम्यान ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंप येथे एक संशयित टॅम्पो येत असल्याचे दिसले. ग्रामीण पोलिस पथकामार्फत हा टेम्पो थांबविण्यात आला आणि टॅम्पो हौद्याची तपासणी केली असता त्यामध्ये पाच बैल जवळजवळ बांधलेले दिसून आले.

दोन पंचांसमक्ष गाडीवरील चालक राहुल आनंदा सावंत (वय २३, रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) आणि त्या टेम्पोमध्ये असलेली दुसरी व्यक्ती ऋषिकेश आनंदा सावंत (वय २६, रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बैल खरेदी केल्याची पावती व त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे आढळून आले तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य व पाण्याची व्यवस्था न करता त्यांना वेदना, यातना होतील या रीतीने दोरीने बांधून कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे असून, त्यांच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ) (ड) (ई) (फ) (एच) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ) (ब), 9 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे कलम 125 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यामध्ये राहुल आनंदा सावंत आणि ऋषिकेश आनंदा सावंत तसेच ६ लाख रुपये किंमतीचा एक सफेद रंगाचा टाटा कंपनीचा 407 टॅम्पो (क्रमांक एम. एच-14-एच.यु-5406) जप्त करण्यात आला आहे. या वाहनातून एकूण १ लाख ३८ हजार किंमतीच्या ५ गोवंश बैलांची सुटका करण्यात आली आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड तसेच रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईंनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक श्री. चव्हाण, सपोफो श्री. सावंत, सपोफौ श्री. कांबळे, मपोहवा श्रीमती. सावंतदेसाई, पोशि श्री. पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button