
मालगुंड-गणपतीपुळे परिसरात भटक्या गोवंशाचा प्रश्न गंभीर; शासकीय गोशाळेच्या उभारणीची जोरदार मागणी
पर्यटनामुळे मालगुंड- गणपतीपुळे परिसराचा मोठ्याप्रमाणात विकास झाला असला, तरी त्याचबरोबर भटक्या गोवंशाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शेतीकडून पर्यटन व्यवसायाकडे वाढलेल्या कलामुळे अनेकांनी पशुपालन आणि शेती सोडली असून, रस्त्यावर भटकणार्या गायींची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यात किमान एक हजार गोवंशांची क्षमता असलेली शासकीय गोशाळा उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मालगुंड-गणपतीपुळे परिसरासह संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात अंदाजे एक हजारांहून अधिक भटकी गुरे फिरत असल्याचे सांगितले जाते. या जनावरांना ना चारा मिळतो, ना राहाण्यासाठी गोठा, तर अनेकांना मालकही नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अन्नाच्या शोधात ही गुरे रस्त्यावरील कचरा आणि प्लास्टिकच्या पिशव्या खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. प्लास्टिक पोटात साचल्याने तसेच प्रसूतीदरम्यान होणार्या गुंतागुंतीमुळे अनेक गायींचा मृत्यू होत असल्याची माहिती स्थानिक शेतकरी देत आहेत. या परिसरात दर आठवड्याला दोन ते तीन गायी अशा कारणांमुळे दगावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.




