
१ कोटी २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने आवळल्या
रत्नागिरी : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी, असल्याचे भासवत डिजिटल अरेस्ट केले असल्याचे सांगून १ कोटी २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या एकाच्या मुसक्या रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबईतून आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील आरोपीने तो बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी, असल्याचे भासवून फिर्यादीला त्यांच्या कॅनरा बँक (माटुंगा, मुंबई) येथील खात्यामधून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असल्याची भीती घालून व त्यासाठी त्यांना डिजिटल अरेस्ट केले असल्याचे सांगून फिर्यादीकडून ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून फिर्यादीची एकूण १ कोटी २३ लाखांची फसवणूक केली होती.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर (दापोली पोलीस ठाणे) ०७/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१८ (२), ३१८ (४), ३१९(२), ३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासदरम्यान फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून प्राप्त झालेल्या माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी निष्पन्न झाल्याने रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यातील तपास पथक मुंबई व ठाणे येथे पाठविण्यात आले होते. तेथे स्थानिक बातमीदार तयार करून त्या आधारे मुंबईतून एक आरोपीस २३ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
गुन्ह्याच्या तपासासाठी व आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, पो. हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम, रोहन कदम, नीलेश शेलार यांनी ही कामगिरी बजावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
“कोणीही पोलीस किंवा सीबीआय अधिकारी, नॅशनल सिक्युरिटी विभाग इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे बँक अकाऊंट, सिम-कार्डचा गैरवापर झाला असून त्यासाठी तुमची चौकशी करायची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल. तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करीता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉल वर विश्वास ठेवू नका, आपली वैयक्तिक / बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका व अशा धमक्यांना बळी पडू नका, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.




