
रत्नागिरीतील एमआयडीसीतील व्यावसायिकाला क्रिप्टो करन्सीमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवत तब्बल 36 लाख 65 हजारांचा ऑनलाईन चुना
फेसबुकवर झालेल्या ओळखीतून महिलेने एकाला क्रिप्टो करन्सीमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवत तब्बल 36 लाख 65 हजारांचा ऑनलाईन चुना लावला. फसवणूकीची ही घटना 4 जानेवरी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी येथील फिर्यादीच्या गांधी फॅब्रीकेटर्स या दुकानात घडली आहे.या प्ररकरणी सुहानी शर्मा आणि डॅनियल (पूर्ण नाव-गाव माहित नाही) या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याची फेसबुक या सोशल मिडीयावर सुहानी शर्मा या महिलेशी ओळख झाली होती. महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन तिचा मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या (ट्रस्टीनकॉईन) या वेब ॲप्लिकेशनचा सिनीअर अकाउंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले. त्यानंतर फिर्यादीला यु.एस.डी.टी ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिचा मित्र डॅनियलव्दारे व्हॉटसॲपवर पाठण्यात आलेली लिंक फिर्यादीने ओपन करुन (ट्रस्टीनकॉईन) हे वेब ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये लॉगीन केले.
तसेच दि. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वेळोवेळी दिशाभूल करुन संशयितांनी फिर्यादीला पैसे गुंतवण्यास भाग पाडले. अशा प्रकारे फिर्यादीने वेळोवेळी असे एकूण 36 लाख 64 हजार 740 रुपये संशयितांच्या सांगण्यावरुन गुंतवले. परंतू आपली फसवणूक झाल्याचे लक्षात फिर्यादीने सोमवार 2 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),319(2),3(5), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(सी),(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




