
सेंट थॉमस स्कूलच्या देवयानी पवार हिची राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड
रत्नागिरी : शिरपूर धुळे येथे झालेल्या सब ज्युनिअर मुलींच्या आंतरजिल्हा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सेंट थॉमस स्कूल मधील देवयानी पवार सहभागी झाली होती. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देवयानी पवार हिची महाराष्ट्र राज्याच्या (डब्लूआयएफए) सब ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलने क्रीडा क्षेत्रात नेहमीच आपले कौशल्य दाखवले आहे. विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून राज्य पातळीवरही आपले स्थान नोंदविले आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याना उत्तेजन व उत्तम मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न नेहमीच शाळेच्या व्यवस्थापनाने तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी केला आहे.
देवयानी हिने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, क्रीडा मार्गदर्शक अजित धावडे, स्वप्नाली पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




