
रत्नागिरी शहरातील दुकानांमध्ये स्मार्ट वीज मीटरमधील रिमोटद्वारे (दूरनियंत्रक)वीज चोरी
रत्नागिरी शहरातील दुकानांमध्ये स्मार्ट वीज मीटरमधील वीज वापराचे युनिट रिमोटद्वारे (दूरनियंत्रक) कमी करून वीज चोरी करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये महावितरणच्या शहर उपविभागाकडून अशा वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.रिमोटद्वारे वीज चोरी करण्याचे प्रकार धनजी नाका येथील तीन दुकानांमध्ये उघडकीस आले आहेत. यांच्याकडून वीज चोरीची रक्कम वसूल करण्यात आली आहे.स्मार्ट मीटर बसण्यापूर्वी वीज चोरी करण्याची पद्धत वेगळी होती. यामध्ये वीज मीटरमध्ये फेरफार करणे, मीटरला थेट जोडणी करणे आणि उच्च दाबाच्या वीज वाहिनीवरून वीजपुरवठा घेणे अशी वीज चोरीची पद्धत होती. परंतु, आता स्मार्ट मीटर बसले असून, यातही चोरी करण्याचा नवीन रिमोट फंडा उघडकीस आला आहे. ज्याप्रमाणे रिमोटद्वारे टीव्ही, एसीसारखी उपकरणे लांबून चालवण्याचा रिमोट असतो त्याप्रमाणे मीटरमधील वीज वापर युनिट थांबवण्यासाठी रिमोट वापरण्यात येत आहेत.
रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथील एका दुकानामध्ये 50 हजार 420 रुपयांची रिमोटद्वारे वीज चोरी झाली. वीजमीटर मालकाकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. त्याचबरोबर नवीन मीटर बसवून देण्याचे 820 रुपये महावितरणकडून घेण्यात आले. इतकेच नव्हे, तर इतर कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठी मीटर मालकाने आणखी 10 हजार रुपये तडजोड रक्कम भरण्याची तयारी महावितरणकडे अर्ज करून दाखवली आहे. धनजी नाक्यावरीलच दुसऱ्या एका दुकानात रिमोटद्वारेच 61 हजार 60 रुपयांची वीज चोरी महावितरणच्या पथकाने पकडली.




