
गुहागरात राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाराजी उफाळून आली, तालुकाध्यक्षांचा राजीनामा देण्याची तयारी
गुहागर नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट राष्ट्रीवादीने आपल्या पक्षश्रेष्ठींबरोबर आघाडीतील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी व्यक्त केली. यामुळे निवडणुकीत आपला उमेदवारच उभा न करण्याचा पवित्रा घेतल्याने पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुहागर विधानसभा असो की पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक असो, गुहागर तालुक्यात मजबुत असलेल्या राष्ट्रवादीला आघाडीत दुय्यम स्थान दिले जात आहे. यावेळच्या गुहागर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीत अद्याप कोणतेच ठोस निर्णय झालेले नाहीत, असे मत तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी व्यक्त केले. सुरूवातीची बैठक झाली. मात्र त्यानंतर आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेने कोणतेच नियोजन केलेले नाही. अशामध्ये आपल्या राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून केवळ जिल्हाध्यक्ष बने यांनी भेट देऊन तुम्हाला आघाडी करायची नसेल तर करू नका, असे म्हणून पक्षपातळीवर कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.www.konkantoday.com




