
रस्ते अपघातांत तरुणांचा सर्वाधिक बळी, दुचाकीस्वारांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या पुढे!
नवी मुंबई : वेगाने विकसित होणाऱ्या नवी मुंबईत रस्ते, उड्डाणपूल आणि महामार्गांचे जाळे विस्तारत असताना रस्ते अपघातांतील मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. २०२४ मध्ये ३२९, २०२५ मध्ये २८३, तर २०२६ मध्ये ऑक्टोबरपर्यंत २४३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे यात दुचाकीस्वार तरुणांची संख्या अधिक आहे. दर दोन दिवसांत एकाचा मृत्यू होत असल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या अपघातांची कारणमीमांसा करण्याचे निर्देश वाहतूक विभागाला दिले. याच अभ्यास अहवालातून धक्कादायक तपशील समोर आला.
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील ६७२ लहान-मोठ्या अपघातांचा अभ्यास करण्यात आला. त्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत २२८ अपघातांत २४३ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतांमध्ये १२० दुचाकीस्वार किंवा दुचाकीवरील प्रवासी (५३ टक्के), तर ८० पादचारी (३५ टक्के) होते. मृतांमध्ये ८० टक्के दुचाकीस्वार तरुण असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय रस्त्याबाहेरील अपघातांत १३, तर अन्य प्रकारच्या अपघातांत ३३ जणांचा मृत्यू झाला. चार सायकलस्वार आणि तीनचाकी वाहनांशी संबंधित अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला.
अपघातांच्या वेळेचे विश्लेषण करताना सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत ३१.१४ टक्के, तर मध्यरात्री बारापासून सकाळी सहापर्यंत २८.५१ टक्के अपघात झाल्याचे आढळले. दुपारी १२ ते सायंकाळी सहा या वेळेत २१.४९ टक्के अपघातांची नोंद झाली.
शीव-पनवेल महामार्गावरील वाशी ते कळंबोली आणि गव्हाण फाटा ते शेडुंग टोलनाका या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी २४ जणांचा मृत्यू झाला. ठाणे-बेलापूर मार्गावर १३, तर मुंब्रा-पनवेल महामार्गावरील तळोजा ते कळंबोलीदरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील अपघातप्रवण ठिकाणांची संख्या २०२३ मधील ३० वरून २०२४ मध्ये २७ आणि सध्या २४ झाली आहे.
वाहतूक नियमन आणि रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी शहरात सुमारे चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. वाहतूक विभागात १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३२ अधिकारी आणि ५२२ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, केवळ यंत्रणांच्या माध्यमातून अपघात रोखणे शक्य नसून वाहनचालकांची स्वयंशिस्तही महत्त्वाची आहे. हेल्मेटचा वापर, वाहतूक सिग्नलचे पालन आणि वाहनाच्या क्षमतेनुसार वेग मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या निर्णयांवर आक्षेप असेल तर न्यायालयात जा; वनमंत्री गणेश नाईकांचे विरोधकांना प्रत्युत्तर
नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या सूचनेवरून रस्ते अपघातांवरील नियंत्रणासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रत्येक अपघाताची नोंद घेऊन अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन तो टाळता यावा यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, असा त्यामागील हेतू आहे. या निरीक्षण अहवालात वाहन चालविताना प्रत्येक वाहनचालकांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण समोर येत असल्याचे डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले.
मुख्य आव्हान
नवी मुंबईत गेल्या तीन वर्षांत रस्ते अपघातांत ८५५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, प्राणघातक अपघातांपैकी मोठ्या संख्येने अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे पोलिसांच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे वाढत्या वाहनसंख्येबरोबरच अपघातांतील मृत्यू रोखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
आयुष्याला कलाटणी
कळंबोलीतील स्टील मार्केटमधील खिडुकपाडा येथे ३० ऑगस्टला सायंकाळी साडेचारच्या सुमारास ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांचा मुलीच्या डोळ्यांदेखत मृत्यू झाला. तर ८ सप्टेंबरला सकाळी सव्वादहाच्या सुमारास पनवेल-जुना पुणे महामार्गावरील कोळखे येथे साचलेल्या पाण्यात दुचाकी घसरून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दिवसा घडलेल्या या दोन्ही घटनांत बालिकेला वडील, तर एका कुटुंबाला घरातील सुशिक्षित विद्यार्थी तरुण गमवावा लागला. अशाच प्रकारच्या अपघातांमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुण दुचाकीस्वार व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे समोर आल्याने स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे, सिग्नल पाळणे याशिवाय वाहनाच्या क्षमतेप्रमाणे मर्यादित वेगात वाहने चालविल्यास ही स्थिती टळू शकेल. पोलीस विभाग यासाठी जनजागृती करतच आहे. मात्र वाहनचालकांनीसुद्धा दक्ष राहूनच वाहन चालविणे गरजेचे आहे.– डॉ. राहुल खाडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई




