
कर्जप्रकरणात ग्राहकांना न्याय मिळवून देणार
रत्नागिरी : राजापूर अर्बन बँकेने कर्ज व्यवहारात गैरप्रकार केले असून, त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे. त्रासामुळे ग्राहकांनी आत्महत्या करू नये. त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकाधिकार समितीने घेतला आहे. लोकांबरोबर राहून त्यांच्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी दिला आहे.
ॲड. करंदीकर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष अनंत शिंदे उपस्थित होते.
आपल्या नावावर बोगस कर्जप्रकरणे करण्यात आली असल्याचा आरोप राजापूर अर्बन बँकेच्या काही कर्जदारांनी केला आहे. काही कर्जदारांनी त्यांच्या मागणीप्रमाणे कर्जखात्याचे कागदपत्र न दिल्याच्याही तक्रारी केल्या आहेत.
बँकेच्या संचालकांनी काही कर्जप्रकरणे चुकीची झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे सहाय्यक निबंधक कार्यालयातर्फे चाैकशी होणे आवश्यक आहे. संबंधित कर्ज प्रकरणात कलम १०१ प्रमाणे वसुली दाखला दिला गेल्यास अशा कर्जदारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणांची सखोल चाैकशी करून कर्जदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत मागणीचे निवेदन सहायक निबंधकांना देण्यात आले आहे.




